काँग्रेसमध्ये दोन कामे शिल्लक करणारे कार्यकर्तेच जास्त - अब्दुल सत्तार

Foto

औरंगाबाद - वेळ आणि ठिकाणाचा गोंधळ संपल्यानंतर तब्बल तीन तास उशिराने कार्यकर्त्यांच्या गर्दीविनाच काँग्रेसची नोटबंदी निषेधार्थ निदर्शने झाली. केवळ ५०-६० कार्यकर्ते आणि काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा निदर्शने उरकण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी, नोटबंदीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

 

आमदार सत्तार म्हणाले, सरकारने जाहीर केलेली नोटबंदीबाबतची आकडेवारी खोटी असून फाटलेल्या आणि लोकांच्या घरात राहिलेल्या नोटा यांचा विचार सरकारने केलेला नाही. यामुळे सरकारने ९९ टक्के नोटा बदलल्या गेल्याची माहिती खोटी असल्याचा आरोप सत्तार यांनी केला.

 

कार्यक्रमाला तीन तास उशीर का झाला आणि ठरलेल्या वेळेत कार्यक्रम का झाला नाही, असे विचारले असता, सत्तार म्हणाले,  ‘कार्यक्रमाची वेळ ही दुपारी २ वाजेचीच होती, मात्र काँग्रेसमध्ये दोन कामे शिल्लक करणारे कार्यकर्ते जास्त आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल असे यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केले. 

यावेळी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार म्हणाले, ‘मोदींनी नोटबंदी करताना जी आश्वासने दिली होती त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. उलट लोकांचे नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे. नोटबंदीमुळे सर्वसामान्य शेतकरी आणि लघु उद्योजक हतबल झाले असल्याचे पवार यांनी सांगितले.